March 14, 2025

कर्ज- घ्यावे की न घ्यावे?

एका आर्थिक नियोजन या कार्यक्रमांमध्ये उपस्थित लोकांना मी जेव्हा विचारलं…किती लोकांनी कर्ज घेतले आहे??किती लोक कर्ज घेण्यास पात्र आहेत??त्यावेळेस 30 टक्के लोकांनी हात वरती केला याचा अर्थ 70 टक्के लोक ही कर्ज घेण्याच्या विरुद्ध आहेत तसेच पात्र नाहीत किंवा कर्ज घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसतात.

कर्ज घेणे हे चुकीचं समजतात किंवा कर्ज घेण्याबद्दल अज्ञानी असतात.कर्ज घेतलेल्या 30 टक्क्यांमधूनही 40% लोकच कर्जाचा वापर योग्य कारणासाठी आणि व्यवसाय📈 वाढीसाठी करताना दिसतात. म्हणजेच 60% लोक घेतलेल्या कर्जामुळे 📉 कर्जबाजारी होतात किंवा बँकेला वर्षानुवर्षे व्याज देत असतात. काही लोक कर्जाची परतफेडही करत नाहीत असे बर्याच वेळेला दिसून येते. काही महाभाग बँकांकडून करोडोच कर्ज घेऊन फरारी झाले आहेत.कर्ज घेऊन यशस्वी होणारे काही लोक म्हणतात “पैसा दुसऱ्याचा धंदा आपला” म्हणजेच इतरांचा पैसा घेऊन व्यवसाय वाढवता येतो, मुलांचे शिक्षण पूर्ण करता येते, आपल्या गरजा पूर्ण करता येतात. तसेच समाजाच्या व देशाच्या प्रगतीमध्ये आपला हातभार लावता येतो.कर्ज घेऊन योग्य प्रकारे व्यवसाय वाढवण्यासाठी नियोजन केल्यास खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतो. म्हणूनच अनेक यशस्वी उद्योजकांचा आलेख पाहिल्यास आपणास असे निदर्शनास येते की त्यांनी कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढवला आणि मोठ्या प्रमाणात नफा कमवला त्यासाठी आपणास अर्थ साक्षर असणे गरजेचे आहे.”पैसा दुसऱ्याचा (बँकेचा) धंदा आपला” याप्रमाणे पैशाचा योग्य कामासाठी वापर केला पाहिजे.

कर्जाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण व्यवसाय कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि सोनं तारण कर्ज याबद्दल बोलूया!
व्यवसाय कर्ज घेण्यासाठी तुमचा व्यवसाय, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल आणि सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे. व्यवसाय कर्ज व्याजदर 11% ते 15% पर्यंत असते.
आज वैयक्तिक कर्जाचा (Personal Loan) पर्याय अनेकजण अजमावितात. या कर्जाचा व्याजदर 12% ते 18% असतो तर काही जण सोने तारण कर्जाद्वारे (Gold Loan) पैसा उभा करतात.
सोने तारण कर्ज हे वैयक्तिक कर्जापेक्षा (Gold loan vs personal loan) अधिक फायदेशीर आहे. सोनेतारण कर्जाचा व्याजदर 7.50% ते 9.50% पर्यंत असतो. तुमच्याकडे अतिरिक्त सोने आहे आणि तुम्हाला पैशांची आवश्यकता असल्यास सोने तारण कर्जाचा पर्याय तुम्ही नक्कीच अजमावून पाहायला हवा. सोनेतारण कर्जाचा दुहेरी फायदा होतो एक म्हणजे तुमचे बँकेत असणारे सोने सुरक्षित राहून सोन्याचा भाव वाढत राहतो आणि घेतलेल्या कर्जातून तुम्ही तुमची गरज भागवू शकता. सोने तारण कर्ज घेणे खूप सुलभ/सोपी प्रक्रिया आहे.
वैयक्तिक कर्ज प्रक्रियेत उत्पन्नाच्या साधनांच्या आधारावर कर्जदाराचे मूल्यमापन केले जाते. व्यवसाय कर्ज व वैयक्तिक कर्जासाठी एकाधिक कागदपत्रांची आवश्यकता भासते. त्यामुळे वैयक्तिक कर्ज मंजुरीसाठी अधिक कालावधी लागतो. आपत्कालीन कामासाठी पैसे हवे असल्यास सोने तारण कर्ज तुम्हाला फायदेशीर ठरेल. कमी कागदपत्रांसह सोने तारण कर्जाला तत्काळ मान्यता दिली जाते.
कर्ज घेऊन अधिक चांगल्या प्रकारे आयुष्य जगणार्या लोकांना मी जवळून पाहिले आहे, आर्थिक नियोजन कसे करायचे यासाठी मी मानधन घेऊन मार्गदर्शन करतो.
तुमचे मासिक उत्पन्न, खर्च आणि तुमचा हप्ता याचा ताळमेळ बसणं खूप गरजेचे आहे कर्ज ज्या कामाला घेतल आहे त्यासाठीच वापरावे.
आर्थिक नियोजन तसेच पैसे कमविणे, पैसे टिकवणे, पैसे वाढवणे आणि पैशाचा उपयोग घेणे हे शिकणे खूप गरजेचे आहे.
-डॉ.संतोष कामेरकर
लेखक, उद्योजक, मेंटोर, बिझनेस व लाईफ कोच.
संचालक – वैश्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई